आंबा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनाच्या बाबतीत भारताचा तसेच महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. जगातील आंब्याचे एकूण उत्पादनाच्या जवळपास निम्मे उत्पादन भारतात होते. आपल्या देशात आंबा फळपिकाखालील लागवडीचे क्षेत्र जास्त असूनही आंब्याचे प्रती हेक्टरी उत्पादन मात्र कमी आहे. फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या आंबा या फळ पिकास कोकण विभागाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे, कोकणातील हापूस आंब्याला एक विशिष्ट चव, गंध व आकर्षक आकार असून या आंब्याला हापूस म्हणून भौगोलिक मानांकन प्राप्त आहे. दिवसेंदिवस हापूस आंब्याखाली तसेच इतरही वाणांचे क्षेत्र वाढत आहे. कोकणातील उष्ण व दमट हवामान हे कीड व रोगास अनुकूल आहे.
कोकण विभागात उत्पादनक्षम आंबा बागांचे क्षेत्र जवळपास १२५००० हेकटर असून या क्षेत्रातून प्रति हेक्टरी दोन टन उत्पादकता धरल्यास जवळपास २५०००० मे. टन आंबा उत्पादन उपलब्ध होते. कोकणातील हापूस आंबा हा दर्जेदार असल्याने परदेशात आंबा फळे, आंबा फळापासून बनवलेला पल्प व इतर पदार्थांची निर्यात होते. या निर्यातीद्वारे परकीय चलन उपलब्ध होते. राज्यातील निर्यातीचे मूल्य जवळपास अडीचशे कोटी असून यामध्ये कोकणातील हापूस आणि केशर आंब्याचा प्रमुख वाटा आहे.
आंब्याच्या उत्पादनात मोहोर संरक्षणाला विशेष महत्त्व आहे. प्रमुख व दुय्य्म पोषण पाण्यांची कामतरता, संजीवकांचा अभाव, योग्य पाणी व्यवस्थापन नसणे आणि किडी व रोगांचा प्रादुर्भाव आदि कारणांमुळे मोहोर करपतो आणि फळगळ होते.
आंब्याला येणाऱ्या मोहरावरच आंब्यामध्ये होणारी फळधारणा अवलंबून असते. म्हणून आंबा बागेपासुन जास्तीचे व अधिक दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी आंब्याला चांगला आणि नियमित मोहर येणे गरजेचे आहे.
आंब्यामधील मोहर निर्मितीची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. मोहर येण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या सर्व घटकांत समन्वय साधने गरजेचे असते. या घटकांमध्ये उपलब्धता आणि विविध संजीवकांची ठराविक पातळी यांचा समावेश होतो. या सर्व घटकांतील एखादा घटक उपस्थित नसला किंवा त्याचे प्रमाण थोडे कमी अधिक झाले तरी त्याचा मोहरावर विपरीत परिणाम होत असतो. आंब्याच्या काही जातींना दरवर्षी मोहर येतो, तर काही जातींना एका वर्षाआड चांगला मोहर येतो. यावर केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, असा मोहोर येण्यास आंब्याच्या कोयीत असलेला जीब्रेलियन्स नावाचा घटक कारणीभूत आहे.
हे घटक प्रामुख्याने फळात तयार होतात आणि फळाच्यामार्फत फांदीत पोहचतात. या घटकाचे मुख्य काम झाडाची वाढ करणे हे असते. ज्या झाडांना वर्षाआड मोहर येतो त्या झाडांत जीब्रेलियन्सचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. यावरून अशा जातीच्या झाडांना दरवर्षी मोहर आणण्यासाठी वाढनिरोधकांचा वापर करण्याची कल्पना पुढे आली. झाडाची वाढ करण्याऱ्या घटकांमुळे मोहर येत नाही, त्यामुळे झाडाची वाढ थोपवणारे घटक झाडाला दिले तर मोहर येऊ शकतो, हे प्रयोगाने आणि अनुभवाने सिद्ध झाले आहे. त्यामुळेच आता आंब्याच्या झाडाला नियमित मोहर आणण्यासाठी वाढनिरोधकांचा वापर केला जातो. यासाठी कल्टार नावाचे वाढ निरोधक प्रभावीपणे काम करीत असल्याचे आढळून आले आहे
आंब्याच्या झाडाचे वय आणि आकार याच्या प्रमाणानुसार कल्टारचा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापर केल्यास आंब्याला नियमित मोहर आणून उत्पादनात सातत्य राखता येते. हे वाढनिरोधक झाडाच्या वाढीला थांबवून वाढीसाठी लागणारी शक्ती झाडाच्या मोहर निर्मितीकडे वळवतात.
कल्टार म्हणजेच पॅक्लोब्यूट्रझोल वापरलेल्या बागांमध्ये उशिरा म्हणजे नोव्हेंबरऐवजी डिसेंबरमध्ये मोहोर येण्याची दाट शक्यता असते. हमखास मोहोर येण्यासाठी प्रति लिटर क्लोरमेक्रॉट क्लोराईड २ मि.लि. या प्रमाणात दहा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या केल्यास फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर चार टक्के पोटॅशिअम नायट्रेटच्या दोन फवारण्या दहा दिवसांच्या अंतराने केल्याससुद्धा मोहोर येण्यास मदत होते; मात्र आलेल्या मोहोराचे चांगल्या प्रकारे संरक्षण करून जास्तीत जास्त फळधारणा कशी होईल, यावर लक्ष केंद्रित करावे लागते.
कल्टार देण्याची पद्धती –
आंबा बागेतील प्रत्येक झाडाच्या बुंध्याभोवती खते घालण्यासाठी आळे केलेले असते. या आळ्याच्या आत साधारणपणे एक फुटावर दुसरे वर्तुळ करावे. या दुसऱ्या वर्तुळाच्या परीघावर खड्डा साधारणपणे ३० सें मी. खोल असावा.
सदर झाडासाठी निश्चित केलेली कल्टारची साधारणपणे १० मि.ली. साठी ३ लिटर या प्रमाणात द्रावण तयार करावे. त्यातील त्या झाडासाठीची मात्रा झाडाच्या बुंध्या भोवती खोदलेल्या छोट्या खड्ड्यात समप्रमाणात ओतावी. त्यानंतर हे खड्डे लगेच मातीने बुजून घ्यावेत.
आंबा मोहोर संरक्षणाचे वेळापत्रक
१. ऑक्टोबरचा तिसरा आठवडा क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली + सायपरमेथ्रीन ५० टक्के ५ मिली डायथेन एम-४५ ३० ग्रॅम + ५० लिटर पाणी.
२. १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम + इमामेक्टीन बेझोएट ५ ग्रॅम + १० लिटर पाणी.
३. १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान मिथिल डिमेटॉन २० मिली + ८० टक्के सल्फर २० ग्रॅम + १० लिटर पाणी.
४. १ ते ५ डिसेंबर दरम्यान डायक्लोरोव्हॉस २० मिली + प्रोपिकोनॅझॉल ५ मिली + डायकोफॉल २० मिली + १० लिटर पाणी.
५.२० ते २५ डिसेंबर दरम्यान कार्बन्डॅझीम पे ग्रॅम + स्पिनोसॅड ५ मिली + १० लिटर पाणी
६. फळे साधारणपणे ज्वारीच्या आकाराची झाल्यानंतर जिब्रेलीक ऍसीड १ प्रेम अॅसिटोन ६० मिली किंवा अल्कोहोल १०० मिली + 9 किलो युरिया अचिलेटेड झिंक २५० ग्रॅम + १० लिटर पाणी.
रासायनिक फवारणीच्या मात्रांवरील खर्च कमी करणे व उत्पादनाचा चांगला दर्जा व उत्पादन वाढीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळीच करण्याच्या हेतूने फळ पिकावरील कीड व रोग नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) ही योजना सन २०११-१२ पासुन राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दर सप्ताहात सर्वेक्षणाशी संबंधित प्रत्येक कृषी सहाय्यक २ निश्चित प्लॉटचे तर कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी प्रत्येकी २ रॅण्डम प्लॉटचे सर्वेक्षण नियमितपणे करत आहेत.
सर्वेक्षणाच्या नोंदी हॉर्टसॅप प्रणालीवर ऑनलाईन डाटा एन्ट्री अहवाल मध्ये भरलेल्या आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी कीड व रोगाची पातळी आर्थिक नुकसान संकेत पातळीच्यावर (ई.टी, एल लेव्हलच्यावर) गेल्यास प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी कृषी विद्यापीठामार्फत प्रसारित केलेल्या सल्ल्यानुसार विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच कृषी उपसंचालक यांचेमार्फत एम किसान पोर्टलद्वारे एसएमएसद्वारे शेतकऱ्याना संदेश पाठविले आहेत, ग्रामपंचायतीच्या वार्ताफलकावर उपाययोजनांच्या जम्बो झेरोक्सच्या प्रती वेळोवेळी लावल्या जात आहेत. क्षेत्रीय स्तरावर पीकनिहाय तंत्रज्ञान व त्यासंबंधित कौशल्ये शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी शेतीशाळांचे आयोजन केले आहे.
उन्हाळी भेंडी लागवड करून करा निर्यात, मिळवा लाखाचा नफा
आंबा फळगळ व व्यवस्थापन
आंब्याला येणाऱ्या एकूण फुलांपैकी फक्त २ ते ३ टक्के फुलांचे परागीकरण होऊन फळधारणा होते. बाकीची सर्व फुले म्हणजेच मोहर गळून जातो. साधारणतः ९९.६ टक्के फुले, फळे विविध कारणांनी झाडावरून गळून पडतात. आंब्याच्या होण्याऱ्या एकण फाळधाराणे पैकी काढणीसाठी फक्त ०.४ ते ०.५ टक्के फळांचे उत्पादन मिळत असते.
आंबा फळमाशी नियंत्रण-
फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे आंब्याची निर्यात करणे अतिशय अवघड झालेले आहे. त्यामुळे या किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर अतिशय उपयुक्त ठरत आहे. यामध्ये असलेल्या मिथाईल युजिनल या रसायनयुक्त कामगंध सापळ्यांचा वापर केल्यामुळे आंब्यावरील फळमाशीचे नर किटक सापळ्यात आकर्षिले जातात. सापळ्यात ठेवलेल्या गंधाकडे नर माशा आकर्षित होऊन सापळ्याच्या आत शिरतात व आतील ल्युरला स्पर्श होऊन मरतात. सापळे लावलेल्या भागातील नर फळमाशीचे प्रमाण कमी होते. परिणामी, मीलनासाठी नर उपलब्ध होत नाही. अशा प्रकारे फळमाशी नियंत्रणात राहण्यास मदत होते. प्रती हेक्टर प्रक्षेत्रासाठी सापळ्यांची संख्या सहा ते दहा असते.
फुल व फळधारणेपासून ते काढणीपर्यंत वापरावे लागतात. ३०-४० दिवसांनी ल्यूर बदलावा लागतो. कोकण विभागात क्षेत्रीय स्तरावर आंबा फळमाशी नियंत्रण मोहीम नोव्हेंबर ते जानेवारी यादरम्यान राबविण्यात येणार आहे. तसेच आंबा फळमाशी नियंत्रणासाठी हॉर्टसॅप योजनेअंतर्गत आंबा फळमाशी रक्षक सापळे प्रक्षेत्रावर लावण्यासाठी पुरविण्यात येतात. चालू वर्षी कोकण विभागातील पाचही जिल्ह्यात पुरेश्या प्रमाणात रक्षक सापळे लावण्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांचेकडून एकूण ३४७२ रक्षक सापळ्याचा पुरवठा केला आहे. तसेच आंबा फळमाशी नियंत्रणासंबंधितच्या उपाययोजना व रक्षक सापळ्याच्या ४००० घडीपत्रिका व १००० पोस्टर्स भित्तीपत्रका) छापाई करून जिल्ह्यांना वाटप केल्या आहेत. याद्वारे विभागातील आंबा फळाचे फळमाशी पासुन चांगल्या प्रकारे संरक्षण होऊन गुणवत्तापूर्ण फळांचे उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे.