Cultivation of okra: उन्हाळी भेंडी लागवड करून करा निर्यात, मिळवा लाखाचा नफा, या आल्या नवीन जाती, संपूर्ण माहिती मोफत

भेंडी हे खरीप व उन्हाळी हंगामात घेतले जाणारे फळभाजी पीक आहे. भारतात भेंडीच्या अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र ही राज्ये भेंडी उत्पादनात अग्रेसर आहेत. महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात भेंडीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. भेंडी मध्ये कॅल्शिअम, आयोडीन ही मूलद्रव्ये व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. उन्हाळी हंगामात पाणी टंचाईमुळे भेंडीला चांगला बाजारभाव मिळतो. सुधारीत वाण व लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उन्हाळी भेंडीपासून चांगले उत्पन्न मिळू शकते

निर्यातीक्षम भेंडीची (okra) गुणवत्ता मानके :

• भेंडी 6  ते 7 सें.मी. लांबीची, ताजी टवटवीत एकसारखी, सरळ व पाचधारी असणाऱ्या फळांची सकाळी किंवा संध्याकाळी 1  ते 2 दिवसांच्या अंतराने काढणी करावी.

• निर्यातीकरिता फळांमध्ये निर्धारीत केलेल्या मर्यादेच्या आत कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या अंशाचे प्रमाण असणे आवश्यक आहे.

• निर्यातीकरिता करंगळी ते तर्जनीच्या जाडीची, डाग अथवा इजा नसलेली कोवळी फळांची प्रतवारी करावी.

• निर्यातीकरिता शिफारस केलेल्या औषधांचा, शिफारशीत मात्रेमध्येच वापर करावा. औषधाची फवारणी व काढणी यामधील अंतराचा तपशील ठेवून त्याप्रमाणे काढणी व फवारणी करावी.

• फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र मिळण्याकरिता फळांचे नमुने उर्वरित अंश तपासणी करिता प्रयोगशाळेत पाठवावीत.

• फळे तोडणीनंतर 250 गेज जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यात भरल्यास फळांचा टवटवीतपणा जास्त काळ टिकून राहतो.

• फळांची प्रतवारी करून त्यांची CFB बॉक्समध्ये पॅकिंग करून निर्यात करावी.

Okra ची सुधारीत वाण

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी भेंडीचे, फुले उत्कर्षा व फुले विमुक्ता हे वाण विकसित केले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी परभणी क्रांती हे वाण विकसीत केले आहे.

  • फुले विमुक्ता – हे वाण हळद्या या विषाणूजन्य रोगास पूर्ण प्रतिबंधक असून रस शोषक किडी व फळ पोखरणारी अळी यास प्रतिकारक्षम आहे. फळे आकर्षक, चमकदार, गडद हिरव्या रंगाची आहेत. पिकाचा कालावधी 100  ते105 दिवस असून हेक्टरी 200  ते 210 क्विंटल उत्पादन मिळते.
  • फुले उत्कर्षाः हिरवी, कोवळी, पाचधारी, चमकदार, 10 ते 12 सें.मी. लांब फळे या वाणास येतात. उन्हाळी हंगामासाठी हे वाण योग्य असून यास ४८ ते ५० दिवसात पहिली तोडणी येते. पिकाचा कालावधी 100 ते 110 दिवस आहे. विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते. हेक्टरी 160 ते 220 क्विंटल उत्पादन मिळते.
  • परभणी क्रांती : विषाणूजन्य रोगास प्रतिकारक्षम असणाऱ्या या वाणाची फळे हिरवी, नाजूक व तजेलदार असतात.120 दिवसाच्या पीक कालावधीत खरीप हंगामात 20 तर उन्हाळी हंगामात 15 तोडण्या होतात. या जातीत हेक्टरी 90 ते 104 क्विंटल उत्पादन मिळते.

• उन्हाळी भेंडीची लागवड 15  जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान करावी. एक हेक्टर पेरणीसाठी 12 ते 15 किलो बियाणे पुरेसे होते. लागवडीचे अंतर 30×15 सें.मी. असून लागवडीपूर्वी बियाण्यास प्रक्रिया करणे गरजेचे आहे. अॅझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळणारे जिवाणू प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळावे. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड 48 टक्के एफ.एस. 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळावे.

• पिकाच्या जोमदार वाढीसाठी खतांचा समतोल पुरवठा करणे गरजेचे आहे. पिकामध्ये उर्वरित अंश तपासणीमध्ये हानिकारक घटकांची मात्रा कमी येण्याकरिता सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी माती परीक्षण करणे ३. आवश्यक आहे. पूर्वमशागत करताना हेक्टरी २० टन शेणखत द्यावे. रासायनिक खतांद्वारे १००:५०:५० नत्र, स्फुरद व पालाश किलो प्रति हेक्टर द्यावे. उरलेले अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणी करताना द्यावे. उरलेले अर्धे नत्र तीन समान हप्त्यात ३०, ४५ व ६० दिवसांनी द्यावे जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास पेरणी करताना फेरस सल्फेट व झिंक सल्फेट प्रत्येकी २० किलो प्रति हेक्टर जमिनीतून द्यावे किंवा पेरणीनंतर ३० ते ४५ दिवसांनी फेरस सल्फेट ०.५ टक्के व योरिक अॅसिड ०.२ टक्केची फवारणी करावी.

आंतरमशागत

तण नियंत्रणासाठी १५ ते २० दिवसाच्या अंतराने खुरपणी करावी तसेच फळे येण्याच्या कालावधीत भर लावावी.

पाणी व्यवस्थापन

उन्हाळी हंगामात पाणी व्यवस्थापन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. लागवडीनंतर हलके पाणी द्यावे. जमिनीची व पिकाची वाढीची अवस्था पाहून दर पाच ते सहा दिवसांनी पाणी द्यावे. वाळलेले गवत, पॉलिथिन आच्छादन किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाण्याची बचत होते. एक दिवसाआड ठिबकद्वारे पाणी द्यावे

कीड व्यवस्थापन

भेंडी पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी या रस शोषक किडींचा व फळ पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.

रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे २५ ते ३० नग प्रति हेक्टर या प्रमाणात ठिकठिकाणी लावावे. इमिडाक्लोप्रीडची बीजप्रक्रिया करावी व्हर्टीतीलीयम लॅकेनी ५० ग्रॅम, कपभर दूध प्रति १० लीटर पाण्यातून फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त झाल्यास फ्लूपायरीडीफ्युरॉन २०० टक्के एस.एल. २० मि.ली. प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात फवारावे.

• फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी किडलेली फळे नष्ट करावी. हेक्टरी १० ट्रायकोकार्डचा वापर करावा फवारणी करताना निंबोळी अर्क ५ टक्के किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के ई.सी. २० मि.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ई.सी. ६ मि.ली. १० लीटर पाण्यातून आलटून-पालटून फवारणी करावी.

रोग व्यवस्थापन

भेंडी पिकावर केवडा, मर व भुरी रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो.

१.केवडा :हा विषाणूजन्य रोग आहे. रोग नियंत्रणाकरिता इमिडाक्लोप्रिड ०.३ मि.ली. प्रति लीटर किंवा निंबोळी तेल ३ मि.ली. प्रति लीटर याची आलटुन-पालटून फवारणी करावी. रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावी.

२.भुरी: रोग नियंत्रणाकरिता गंधक भुकटी ०.८ टक्के डब्ल्यू.पी. २५ ग्रॅम किंवा कार्वेडॅझीम १० ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल २० मॅम प्रति १० लीटर पाण्यातून फवारणी करावी. रोगाची लक्षणे दिसताच १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी

3.मर: मर रोगाच्या नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा व्हिरीडी १.५ टक्के पावडर डब्ल्यू.पी. २० ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. कृषीमाल निर्यात करताना औषध फवारणीनंतर तोडणीसाठीच्या प्रतीक्षा कालावधीचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. तसेच लेबल क्लेमनुसार कीटकनाशके व बुरशीनाशके वापरणे आवश्यक आहे

 काढणी व उत्पादन

भेंडीची तोडणी सकाळी केल्यास ताजेपणा व रंग जास्त काळ टिकून राहतो. लागवडीपासून ४० ते ४५ दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते. फुले आल्यानंतर ४ ते ६ दिवसांनी तोडणी होते. कोवळी, लुसलुशीत व वजनदार भेंडीची तोडणी करावी. दिवसाआड तोडण्या कराव्यात. तोडणीकरिता विद्यापीठाने विकसित केलेल्या भेंडी कात्रीचा वापर करावा, एक हेक्टर लागवडीद्वारे १५ ते २० टन उत्पादन मिळते

3 thoughts on “Cultivation of okra: उन्हाळी भेंडी लागवड करून करा निर्यात, मिळवा लाखाचा नफा, या आल्या नवीन जाती, संपूर्ण माहिती मोफत”

Leave a Comment